12:19 AM

हरिश्चंद्रगड




पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटाची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिरवरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते.

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.

हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

12:09 AM

अखंड सावधान असावें




नारायण सूर्याजीपंत ठोसर या नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. लग्नाचे विधी सुरू झाले. मुलासमोर अंतरपाट धरला गेला. मुलीला आणून उभे केले. मंगलाष्टके सुरु झाली आणि मंगलाष्टकातील 'शुभमंगल सावधान' हे शब्द ऐकताच तो बारा वर्षांचा मुलगा एकदम 'सावध' झाला आणि या भरल्या लग्नमंडपातूनच त्याने धूम ठोकली. त्याला सांसारिक प्रपंचात रस नव्हता. विश्वाचा प्रपंच आपण करावा, अशी ओढ त्याला अगदी कोवळ्या बालपणातच लागलेली होती. या ओढीने त्याला लग्नमंडपातून खेचून नेले. त्याच्या हातून तपश्चर्या घडली. अनुष्ठाने घडली आणि तो मुलगा श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणून जगाला ज्ञात झाला.

विवाहमंडपात ऐकलेले 'सावधान' हे शब्द अवधान म्हणजे लक्ष आणि सावधान म्हणजे लक्षपूर्वक हा अर्थ त्याने मनाच्या गाभार्‍यात इतका जपून ठेवला की सावधानतेची शिकवणूक आयुष्यभर विविध प्रसंगी या मुलाने महाराष्ट्राला दिली. 'सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळ मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले नवजे' मोक्ष मिळवावयाचा असेल तर, सावध, साक्षेपी आणि दक्ष राहाणे आवश्यक आहे. हे समर्थ परखडपणे सांगतात. 'सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयाशी साधन सायास करणेचि न लगे' असा समर्थांचा स्वानुभवपूर्ण निर्वाळा आहे. समर्थ स्वत: तर सावधानपणे वागलेच पण या महाराष्ट्रालाही त्यांनी सावधानतेचा मंत्र दिला.

समर्थानी रूढ अर्थाने संसाराचा त्याग केला होता. पण त्यांच्याजवळ जी कुबडी होती तिच्यात गुप्ती दडवलेली असे. ही त्यांच्या अखंड सावधानतेची एक प्रकारे निशाणी होय आणि त्यांचे हे सावधानपण सगळ्या ठिकाणी होते. खबरदारी आणि वेगी तेणे सामर्थ्य चढे अंगी असा उपदेश समर्थांनी केला आहे. आणि 'इशारतीचे बोलू नये बोलायाचे लिहू नये लिहावयाचे सांगू नये जबाबीनें असे व्यवहाराचे शाश्वत सूत्रही पुढल्या पिढीसाठी शब्दबद्ध करून ठेवले आहे. प्रपंचातही हे सावधानपण किती आवश्यक असते ते सांगताना समर्थ म्हणतात, सावधानपणे प्रपंच केला तेणें सुखचि पावला दीर्घ प्रयत्ने मांडला कार्यभाग साधे आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा नव्या पिढीला आदेश देतांना 'विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाचि करणे' या शब्दात सावधपणे वागण्याची आवश्यकता समर्थांनी प्रतिपादिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाल्यानंतर समर्थांनी संभाजी महाराजांना ज्या पत्राद्वारे उपदेश केला त्या पत्राचा प्रारंभच मुळी 'अखंड सावधान असावें दुश्चित कदापि नसावें तजवीजा करीत बसावें एकंत स्थळीं' 'अखंड सावधान असावे' असा सल्ला किंवा उपदेश जो समर्थांनी दिला होता तो दुर्लक्षित झाल्यामुळेच की काय संभाजी महाराजांना एका दुष्ट कारस्थानाला बळी पडावे लागले आणि या तडफदार, शूर आणि कर्तबगार राजाला महाराष्ट्राला मुकावे लागले.

3:11 AM




जोगवा या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट्र राष्ट्रीय चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यामुळे जोगवा या प्रकाराविषयी एक कुतूहल लोकमानसात निर्माण झाले आहे. जोगवा या चित्रपटाआधी याच विषयावर 'झुलवा` हे नाटक रंगभूमीवर आले आणि त्या नाटकाच्या आगेमागे 'गिध` हा स्मिता पाटील, नाना पाटेकर अभिनित हिंदी चित्रपट पडद्यावर झळकला होता. यल्लम्माचे उपासक जोगते आणि जोगतिणी यांच्या दर्दभर्‍या जीवनाची कहाणी चित्रीत करणारा 'कथा नाम्या जोग्याची` हा चित्रपट देखील मराठी पडद्यावर झळकला. एकूणच यल्लम्माच्या या उपासकांकडे आणि यल्लम्माच्या उपासनेतील अनिष्ट प्रथांकडे समाजातील सर्जनशील वर्ग डोळसपणे पाहू लागल्याचे हे चिन्ह आहे. जोगते किंवा जोगतिणी डोळसपणे पाहू लागल्याचे हे चिन्ह आहे. जोगते किंवा जोगतिणी या अनुक्रमे देवदास आणि देवदासी वर्गात मोडत असल्या तरी देवदासी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर यल्लम्माला मुले किंवा मुली सोडण्याची अनिष्ट प्रथा पूर्णपणे बंद झालेली आहे असे नव्हे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित, श्रद्धेच्या किंवा अंधश्रद्धेच्या ओझ्याखाली वावरणार्‍या समाजात अजूनही देवदासी परंपरा सुरू आहे. या परंपरेचा अधिक्षेप चैतन्य महाप्रभू, बसवेश्वर, शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर, संत एकनाथ, संत तुकाराम या व अशा अनेक संतांनी केलेला असला तरी ही प्रथा सुरूच आहे.

जोगवा या शब्दाचा भारतीय संस्कृतीकोषात दिलेला अर्थ असा -
''महाराष्ट्रातील देवीचे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालून कपाळी भंडार लावून आणि हाती परडी घेऊन देवीच्या नावाने जी भिक्षा मागतात, तिला जोगवा असे म्हणतात. विशिष्ट आधि-व्याधींच्या निरसनासाठी अथवा इच्छित कामनांच्या पूर्तीसाठी इतर लोकही नवसाने मंगळवारी, शुक्रवारी किवा नवरात्रात जोगवा मागतात. ज्यांच्या घरी देवीचा कुळधर्म असतो, त्यांना कुळधर्माचा एक भाग म्हणून जोगवा मागावा लागतो. नवसाने जोगवा मागणार्‍यांत स्त्रियांची संख्या अधिक असते.``

जोगते व जोगतिणी या प्रथेतील एक उपासक. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदी शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. जोगवा हा त्यातील एक. मुख्य म्हणजे जोगवा हा नृत्यप्रकार नाही तर संत एकनाथांचे भारूड आहे. ते भारूड असे -


अनादि निर्गुण प्रगटली भवानी।
मोहमहिषासुर मर्दनालागुनी।।
त्रिविध तापांची कराया झाडणी।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणीं।।
आईचा जोगवा जोगवा मागेन।
व्दैत सारूनी माळ मी घालीन।।
हातीं बोधाचा झेंडा घेईन।
भेदरहित वारीसी जाईन।।
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा।
करूनी पीटीं मागेन ज्ञानपुत्रा।।


या भारूडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत. याबरोबरच भवानी आईचा रोडगा ही प्रसिद्ध आहे.

सत्वर पावगे मला। भवानीआई रोडगा वाहिन तुला।।१।।
सासरा माझा गांवी गेला। तिकडेच खपवी त्याला।।२।।
सासू माझी जाच करती। लवकर निर्दाळ तिला।।३।।
जाऊ माझी फडफड बोलती। बोडकी करगं तिला।।४।।
नणंदेचें पोर किरकिर करितें। खरूज होऊंदे त्याला।।५।।
दादला मारून आहुती देईन। मोकळी करगे मला।।६।।
एकाजनार्दनी सगळेंचि जाऊंदे। एकटीच राहूंदे मला।।७।।


मराठी लोकधर्मात जोगवा हा एक उपासनाप्रकार म्हणून रूढ असला तरी सद्यकालिन समाजाने या उपासना प्रकाराला लोकनृत्य म्हणून नामाभिधान दिले आहे. जोगवा या परंपरेतील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी समाजाच्या तळातील थरापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन पोहोचला पाहिजे. समाजातील जाणत्या वर्गाने या संदर्भात कळ सोसली पाहिजे कारण डोक्याच्या केसांची जट कापणे सोपे आहे पण अनिष्ट रूढींच्या प्रभावाखाली असणार्‍या मनाची जट कापायला पिढ्यांची मानसिकता जावी लागेल.

6:37 AM

3:34 AM




लेण्याद्रीचा गणपती उंच डोंगरात आहे. उंच डोंगरातल्या कुशीत खोदलेल्या लेण्यांमध्ये या गणपतीचे देऊळ आहे. दक्षिणाभिमुख असलेल्या या लेण्यांपर्यंत जायला सुमारे तीनशे पाय-या चढाव्या लागतात. पण , या पाय-या चढणे हादेखील एक छान अनुभव असतो.

मुळात या बुद्धकालिन अठरा लेण्या आहेत. त्यातल्या आठव्या गुहेत हे मंदिर आहे. त्यालाच गणेश - लेणी असेही म्हणतात. एकाच दगडात हे मंदिर घडवलेले आहे. या मंदिराचा सभामंडप पाहताना आपण थक्क होतो. ५३ फूट लांब , ५१ फूट रुंद आणि सात फूट उंच असेलल्या या सभामंडपला कुठेही पिलर नाहीत.
दक्षिणाभिमुख असलेली या मंदिरातली गिरिजात्मजाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. अष्टविनायकांच्या इतर गणपतींपेक्षा ही मूर्ती थोडी वेगळी आहे. कोरलेली मूर्ती असल्याने ती तितकीशी सुबक दिसत नाही. आजही या मंदिरात लाइट नाहीत. ज्या काळात हे मंदिर बांधले गेले त्याकाळात त्याची रचनाच अशी होती की , या मूर्तीवरच सरळ सुर्यकिरणे येतात.

लेण्यांशेजारीच गोड पाण्याचं टाकं आहे. हे पाणी स्वच्छ आणि थंड असतं. लेण्यांची व्यवस्था पुरातत्व खात्याकडे आहे. जुन्नरचे सरपंच देशपांडे हे देवालयाचे सरपंच आहेत.
लेण्यांकडे जाण्याचा रस्ता तसा फारसा खडतर नाही. पण नेहमी पाय-या चढताना वाटेत काही झाडे , सावली किंवा थांबण्याची सोय असते. अशी कोणतीही सोय लेण्याद्री चढताना उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊनच लेण्याद्री चढायची वेळ ठरवून ध्यावी , शक्यतो पहाटे किंवा दुपारी चार नंतर म्हणजेच उन्हे उतरल्यावर चढायला सुरवात करावी.

जशी इथे झाडे , सावली यांची सोय नाही तशीच या लेण्यांच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचीही सोय नाही. म्हणून इथे जाताना बरोबर खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊनच जावेत , असं मी सांगेन.

लेण्याद्रीचा गणपती तर सुंदर आहेच , तितकाच या भागाच्या आसपासचा परिसरही सुंदर आहे. या आसपासच्या परिसरात शिवनेरीचा किल्ला आहे. चावंडचा किल्ला , पूरचं कुकडेश्वर मंदिर आहे. त्याशिवाय जीवधान किल्ला , हडसर किल्ला हेदेखील इथून जवळच आहे. इथून तुम्ही सहजपणे नारायणगावलाही भेट देऊ शकता. तिथे आर्वीचं उपग्रह दळणवळण केंद्र , खोडदची रेडिओ दुर्बीण अशी अनेक ठिकाणे भेटी देण्यासारखी आहेत. म्हणूनच लेण्याद्रीच्या गणपतीला बेट द्यायला जाताना चार-पाच दिवसांची सवड काढूनच जायला हवे. त्यामुळे गणपतीचे दर्शन तर होऊलच , पण आजूबाजूचा निसर्गाने नटलेला हा नितांतसुंदर परिसरही पाहून होईल. आर्वीच्या दुर्बीणीसह अनेक नव्या गोष्टींशी ओळख होईल. द-याखो-यात रमणा-यांसाठी तर जीवधन , हडसर हे किल्ले आहेतच. म्हणूनच हा गणपती जरा तब्येतीत पाहा.

जुन्नर तालुक्यातलं लेण्याद्री जायला मुंबई-कल्याण ओतुरमार्गे सुमारे १७९ किमी आहे. पुणे- जुन्नर किंवा तळेगाव जुन्नर एस.टीने जाऊन तिथून पुढे बसने किंवा वाहनाने लेण्याद्रीला जाता येतं. राहण्याची आणि जेवण्याची जुन्नर आणि परिसरात होऊ शकते.

3:28 AM

भिमाशंकर




भगवान शंकराचं मुख्य स्थान हिमालयातील कैलास जरी असलं तरी पश्चिम घाटाच्या डोंगररांगाही त्याला प्रिय आहेत. सह्यादीतल्या अशा कितीतरी सुरम्य... दाट रानांनी वेढलेल्या ठिकाणी त्याच्या वास्तव्याच्या जागा आहेत. या दुर्गम जागांच्या भोवती परंपरेने अनेक कथा गुंफलेल्या आहेत. अशीच एक पौराणिक कथा... एका अरण्यात भीमक नावाचा राजा उग्र तप करत होता. त्याच्या तपावर श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी राजाला दर्शन दिलं. त्या वेळी शिवाच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. राजाने त्या धारांची नदी होऊ दे. अशी शिवाजवळ प्रार्थना केली. शिवाने ' तथास्तु ' म्हटलं... आणि भीमेचा उगम झाला. स्थळाला नाव पडलं... भिमाशंकर.

इथल्या संपन्न निसर्ग... घनदाट जंगल... भरपूर कोसळणारा पर्जन्य... मेघांनी वेढलेला आसमंत... साहजिकच परिसर मंतरलेला. मनातली देवाची कल्पना वृद्धिंगत करणारा... त्यातच शंकराचं बारा ज्योतिलिंगापैकी एक देऊळ... यामुळे मराठी श्रद्धाळू मनाचा ओढा इथे पूवीर्पासून आहे. Bhimashankar भिमाशंकरला रस्त्याने जायला पुणेनगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मंुबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी एवढं आहे. पुण्याहून भिमाशंकर 168 किमी आहे. मंुबईहून जायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कल्याणनगर रस्त्याने मुरबाड , माळशेज घाट पार करत आळेफाटा गाठायचं. पुढे पुण्याच्या दिशेला असलेल्या नारायणगाव मागेर् मंचरला वळायचं. दुसरा मार्ग म्हणजे मंुबई-पुणे मार्गावरील लोणावळा ओलांडून तळेगावहून आतल्या रस्त्याने राजगुरूनगर मागेर् मंचर गाठायचं. मंचर-भिमाशंकर हे अंतर साधारण 70 किमी असून मार्ग दाट जंगलाचा व निर्जन आहे. पावसाळ्यात या भागात प्रचंड धुकं असतं. Bhimashankar कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचा वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ' गणपतीघाट ' या नावाने ओळखला जातो. हा रस्ता थोडा वळण घेऊन जाणारा (ञ्जह्मड्ड 1 द्गह्मह्यद्ग) असला तरी अतिशय निधोर्क आहे. दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगरभटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. पहिल्या पठारावर जाणारा हा मार्ग एका उभ्या कड्याच्या कपारींमध्ये काढलेल्या असल्याने पावसाळ्यात पूर्णपणे निसरडा होतो व बहुतेक टप्पे दरीच्या बाजूने असल्याने द्ग 3 श्चश्ाह्यद्गस्त्र आहेत. असं जरी असलं तरी नेहमीच्या सराईत भटक्यांना या साहसी मार्गाने जाण्याची ओढ असते. तरुणांच्या सहज प्रवृत्तीप्रमाणे त्यांना थरार अनुभवायला आवडतोच. पण जरा जपूनच गेलं पाहिजे. Bhimashankar या पठारावर वाटेपासून थोडादूर पदरचा किल्ला आहे. याला ' कलावंतीणीचा महाल ' असंही म्हणतात. या डोंगररांगेच्या वातावरणात खूपच गारवा असतो. त्यातच वरती घाटावर भन्नाट वारादेखील असतो. त्यामुळे आपल्या सॅकमधले सगळे कपडे प्लास्टिकमध्ये चकाडबंद केलेले असावेत. रात्री काढलेले बूट सकाळी घालताना मात्र तपासूनच घालावेत. कारण जंगल दाट असल्याने व बाहेरच्या गारव्यामुळे किडीकिरडू तुमच्या उबदार बुटांचा आश्रय घेण्याची दाट शक्यता आहे. हा भाग दुर्गम असल्याने वीजदेखील अनेक वेळा जाते. त्यामुळे सोबत उत्तम विजेचीर व मेणबत्या ठेवाव्यात. सगळा ट्रेक दाट रानातून जात असल्याने मळलेल्या वाटेव्यतिरिक्त गुरांच्या अनेक वाटा आहेत. या वाटांवर भरकटण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे खांडसहून स्थानिक माणूस घेणं अत्यावश्यक आहे. खांडराहून कर्जतला जाणारी शेवटची बस संध्याकाळी चारला असल्याने परतीचा प्रवास लवकर सुरू करावा. Bhimashankar मंदिराच्या अगदी शेवटपर्यंत बस जाते. मंदिर थोडं खालच्या बाजूला असल्याने पाच मिनिटं दगडी पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिराची बांधणी साधी असून गाभारा मोठा आहे. मंदिरासमोर भल्यामोठ्या दगडी खांबांना लटकवलेली प्रचंड घंटा आहे. देवळाच्या आजूबाजूला पुजारयांच्या घरांतून राहण्या- जेवण्याची उत्तम व्यवस्था होते. तसंच आजूबाजूच्या धर्मशाळा व खानावळी आहेत. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची व्यवस्था या जागेपासून पाच सात मिनिटांवर आहे. या समृद्ध जंगलात... अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीवन आहे. इथे आढळणारी भली मोठी खार... शेकरू... विशेष प्रसिद्ध आहे. तिथल्या अरण्यात नाना प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात. पावसाळ्यात रात्री चमचमणाऱ्या वनस्पतीदेखील आहेत. ग्रुप जर मोठा असेल व जंगलात फिरायची आवड असेल तर इथे भटकायला खूप मजा आहे. सोळा सतरा किमीवर असलेल्या अहुपे या गावापर्यंतचे जंगल अनेक अदूत गोष्टींनी भरलेले आहे. या पठारावरून समोरची माथेरानची डोंगररांग , गोरख , मच्छिंदचे सुळके , हरिश्चंदगड , नाण्याचा अंगठा... असा विशाल परिसर नजरेत येतो. Bhimashankar तर अशा निसर्गाचे भव्य रूप असलेल्या भिमाशंकरचा फेरफटका अंर्तमनाला असीम शांततेची अनुभूती देणारा... तरुणांच्या सळसळत्या चैतन्याला वाव देणारा...

3:14 AM

श्री विघ्नेश्वर - ओझर




भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो वस्मप: ।
नाना मूर्तीधरोऽपि नैजमशीमाऽ खंड: सदात्म प्रभू ।।
स्वेच्छा विघ्नदर सदासुखकर सिद्ध: कलौ स्वेपुय: ।
क्षेत्रे ओझर के नमोऽस्तु सततं तस्मै परब्रह्मणे ।।७।।

अर्थात - ज्याचे मुख हत्तीसारखे आहे. जो भक्तांवर कृपा करतो, जो विघ्न हरण करतो, जो मोक्ष देतो, ज्याने विविध रूपे धारण करूनही ज्या सर्व श्रेष्ठ परमेश्वराचा महिमा अगाध आहे, जो स्वत:हून भक्तांची विघ्ने नष्ट करून त्यांना सदैव सुख देतो, जो स्वत: कलेमध्ये निपुण आहे व जो ओझर क्षेत्री वास करतो अशा परमेश्वराला मी नमन करतो व अशा परब्रह्मापाशी माझे मन सतत लागो अशी मी प्रार्थना करतो.

विघ्नेश्वराचे पुर्वाभिमुख भव्य मंदीर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील कुकडी नदीच्या तिरावरील ओझर या ठिकाणी आहे. मंदीर भोवताली भक्कम तटबंदी आहे. पूर्वेंच्या महाद्वारातून प्रवेश केल्यावर दोन उंच दिपमाळा लक्ष वेधून घेतात. दिव्याची रोषणाई केल्यावर प्रकाशात न्हाऊन निघणा-या दिपमाळांची शोभा अवर्णनिय असते. महाद्वाराच्या आत दोन बाजूंना डौलदार दगडी कमानी असणा-या, लांब रूंद ओव-या आहेत. त्यातील एका ओवरी खाली देवाचं सामान ठेवण्यासाठी तळखर आहे. मुख्य मंदीराच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूस दगडात कोरलेले भालदार, चोपदार अर्थात द्वारपाल आहेत. मंदीरात एका आत एक असे दोन सभामंडप आहेत. सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात विघ्नेश्वराची पूर्वाभिमुख पूर्णाकृती डाव्यासोंडेची, बैठी मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके व कपाळावर चकचकीत हिरा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धि – सिध्दीच्या पितळी मूर्ती आहेत. गाभा-यातील कोनाड्यात पंचायतन मूर्ती आहेत.

सतकर्मात विघ्ने आणणा-या विघ्नासूराच्या विनंती वरून गणेशाने विघ्नेश्वर हे नाव धारण केले. त्याची कथा अशी की, हेमवती नगरीचा राजा अभिनंदन याने इंद्रपदाच्या लालसेने यज्ञ सूरू केले. यज्ञात सर्व देव-देवतांना योग्य ती आहूती देण्याची त्याने तयारी केली परंतू इंद्रपद घ्यायचे आहे. तर इंद्रास आहूती का द्या या विचाराने त्याने इंद्राला आहूती न देण्याचे ठरविले हि गोष्ट नारदमूनीने तत्काल आपल्या पध्दतीने इंद्रदेवास कथन केली. आपले इंद्रपद हिरावून घेण्यासाठी आरंभलेल्या अभिनंदन राजाचा इंद्रास राग आला. इंद्राने पवित्र कार्यात विघ्न आणणा-या काळास अभिनंदनाचे यज्ञ उध्वस्त करण्याची आज्ञा दिली. काळाने विघ्नसूराचे रूप घेऊन केवळ अभिनंदनाच्या यज्ञाचाच नव्हे तर पृथ्वीतलावरील सर्वच वैदीक कार्याचा नाश करण्याचा सपाटा लावला. त्यामूळे ऋषी मुनी, देव – देवता भयभीत होऊन पराशरमूनीच्या आश्रमात वास्तवास असणा-या गणेशास शरण गेले व हे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले. गणेशाने त्यांना अभय देऊन पाश्वपूत्राचे रूप घेऊन विघ्नसूराच्या रूपात असणा-या काळाशी युध्द आरंभले व त्याला बेजार करून टाकले. शेवटी हारलेला विघ्नासूर गणपतीस शरण आला. व जिवदान मागितले. गणपतीने, “जेथे माझी पूजा, अर्चना, स्मरण असेल तेथे तू असता कामा नये.” या अटीवर त्याला जिवदान दिले. परंतू विघ्नेसूराने गणेशाजवळ अजून एक विनंती केली की, भगवान तूमचे स्मरण माझ्या नावाने व्हावे. गणेशाने त्याची विनंती मान्य करून ते विघ्नेश्वर (विघ्नहर) झाले.

मार्ग : ओझर – पुणे – नाशिक रस्त्यावर नारायणगांव पासूनच ओझरला जाण्यासाठी फाटा फुटतो. नारायणगावपासून ओझरच्या विघ्नेश्वराचे देवस्थान अवघ्या १० कि.मी.वर पुणे – ओझर – ९८ कि.मी. नारायणगांव तसेच जुन्नरहून एस.टी, रिक्षा, जीप यांनी प्रवास करून आपण ओझरपर्यंत जाऊ शकतो.

2:50 AM

Shivneri Fort


Shivneri Fort is one of the most magnificent as well as historically rich forts of India. It is situated at a distance of approximately 90 km from the Pune city of Maharashtra. The fort dates back to the time period when Shivaji was not even born yet. Shivneri Fort was built under the aegis of Sahaji, the father of Shivaji, who wanted a strong fortification that could protect his family from the enemies. Infact, Jijabai (Shivaji's mother) spent the days of her pregnancy here and it was here only that Shivaji Maharaj was born, in the year 1627.

Almost the entire childhood of Shivaji was spent playing inside the compound of the fort. He received most of his basic education here only and the lessons he learnt here were responsible, to quite an extent, in shaping his personality as a great ruler. Apart from its connection with Chhatrapati Shivaji, the fort is also quite popular for its magnificent architecture. To make the Shivneri Fort enemy proof, Sahaji ordered the construction of seven massive gates. One has to go through all the seven to gain entrance into the fort.

Badami Talav, a small pond situated in the heart of the fort, is one of its most endearing features. In the vicinity of the pond is a magnificent statue of Jijabai, along with her son Shivaji. There are a number of structures near the Shivneri Fort that are worth having a look at. Amongst them is a temple dedicated to Goddess Shivani. The local people of the area believe that Shivaji was named so, after the Goddess only. Then, there are the splendid Nane Ghat and the Jivdhan Fort. So, whenever you visit Pune, make sure to pay a visit to the historical fort also.

11:53 PM

शिर्डी आणि साईबाबा



शिर्डी आणि साईबाबा
ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो अशी समानतेची शिकवण देणारे आधुनिक संत शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्या वास्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावाला जागतिक ओळख दिली.

शिर्डी आणि साईबाबा हे आता समानार्थी शब्द झाले आहेत. साईबाबांचे हे मंदिर गावाच्या मध्यभागी वसले आहे. याशिवाय साईबाबाच्या वास्तव्याने पावन झालेल्या खंडोबा मंदिर, द्वारकामाई, चावडी अशा ठिकाणांना रोज हजारो भक्त भेट देतात. समाधीमंदिर हे मुख्य ठिकाण. याठिकाणी पुर्वी वाडा होता. साईबाबांचे वास्तव्य अखेरच्या काही दिवसात इथे होते. इथे साईबाबांची समाधी आहे. या मंदिरात शांत निवांतपणे बसलेल्या स्थितीतली पांढर्‍या शुभ्र संगमरवराची साईबाबांची मूर्ती आहे. समाधी मंदिराचे नित्य उपक्रम सकाळी ५ वा. सुरू होतात. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घुमणारे भुपाळी स्वरांनी भक्त मंदिराकडे साईबाबांच्या ओढीने खेचला जातो.

याशिवाय भक्त दर्शन घेतात ते खंडोबा मंदिराचे. हे तेच मंदिर आहे ज्याठिकाणी साईबाबांनी शिर्डीत सर्वप्रथम दर्शन दिले होते. असे सांगतात की या मंदिराचे विश्वस्य आसलेल्या म्हाळसापती सोनारांनी कफनी घातलेल्या दाढी वाढलेल्या साईबाबांना पाहताक्षणी `या! साई` अशी हाक मारली आणि तेव्हापासून ते साईबाबा याच नावाने भक्तांना परिचित झाले. इथे एक मोठे वडाचे झाड आहे. आता इथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यात साईबाबांच्या पादुका ठेवल्या आहेत.

त्यानंतर गुरुस्थानाचे दर्शन भक्त मोठ्या श्रध्देने घेतात. साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे याठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुची समाधी आहे. इथे अजूनही ते कडुनिंबाचे झाड बहरले आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि साईबाबांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर दर मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी धुनी पेटवण्यात येते. गुरुस्थान हे आत्मीक शांती देणारे ठिकाण आहे.

द्वारकामाई! हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण. साईबाबा जिथे राहायचे त्या ठिकाणाला ते द्वारकामाई म्हणून संबोधायचे. असं सांगतात की, साईबाबा लग्नाच्या वर्‍हाडासोबत शिर्डीला आले आणि उतरले ते याच ठिकाणी आणि अखेरपर्यंत ते इथेच राहिले. इथल्या धुनीची उदी भक्तांना द्यायचे. द्वारकामाईला लागून एक संग्रहालय साई संस्थानाने विकसित केले आहे. याठिकाणी साईबाबांच्या रोजच्या वापरातले पाण्याचे भांडे, कांबळे, जाते इ.वस्तू ठेवल्या आहेत. शिवाय ज्या दगडावर बसून साईबाबा भक्तांचे दु:ख निवारत तो मोठा दगडही इथे ठेवला आहे. साईबाबांचे एक मोठे पोट्रेट याठिकाणी आहे.

ज्या ठिकाणी साईबाबा झोपायचे त्याठिकाणाला ते चावडी म्हणायचे. ही चावडी द्वारकामाईला लागूनच आहे. इथेही साईबाबांचे एक मोठे पोट्रेट लावले आहे. समाधी मंदिर आणि इतर संबंधित ठिकाणांचे दर्शन एक आत्मशांतीचा अनुभवन देणारे आहे.

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

11:48 PM

'नाच्या`




'खेळ तो येणेची खेळावा ,
नट तो येणेची नटावा,


अशा स्वरूपाचे एक संतवचन आहे. अर्धनारी नटेश्वराची संकल्पना भारतीय संस्कृतीत रूढ असून 'सत्यम,शिवम, सुंदरम्` चा प्रत्यय या अर्धनारीनटेश्वरामध्ये येतो असे म्हणतात. भरतमुनींच्या नाटयशास्त्रात आहार्य, आंगिक, वाचिक असे अभिनय प्रकार विषद केलेले आहेत आणि अभिनयासोबत नृत्य आणि नृत हा विचार मांडला गेला आहे. नृत्य करणा-या स्त्रीला 'नर्तिका` तर नृत्य करणा-या पुरूषाला 'नर्तक` असे म्हटले जाते. लोकधाटी परंपरेत नर्तिका आणि नर्तक हे शिष्ट शब्द अनुक्रमे 'नाची आणि 'नाच्या` म्हणून संबोधले जातात. नाच्याची परंपरा ढोलकी फडाच्या तमाशात आहे. तशीच ती खडीगंमत आणि आदिवासी ठाकर समाजाच्या तमाशात आढळून येते.

लोककला प्रकारांमध्ये स्त्री अथवा पुरूष यांचे नर्तन मंदिर परिसरातील भक्तीनाटयांमध्ये, अंगणीय आणि प्रांगणीय कलाप्रकारांमध्ये आढळून येते. पण या कलाकारांना नाची किंवा नाच्या म्हणून संबोधले जात नाही. मंदिर परिसरात नृत्य करणा-या स्त्री कलावंत या प्रामुख्याने देवदासी परंपरेतल्या असतात. ज्यांत भाविणी, मुरळया, जोगतिणी, जान्या आदींचा अंतर्भाव असतो. या स्त्रिया जरी नृत्य करीत असल्या तरी त्याना नाची म्हणून संबोधले जात नाही. केवळ तमाशातील स्त्रीलाच नाची म्हणून संबोधले जाते. नाची किंवा नाच्या या स्वरूपाचे संबोधन फार आदरयुक्त म्हणून मानले जात नसेल, तरी एकेकाळी आपण तमाशातील नाची अथवा नाच्या आहोत असा उल्लेख गौरवाने केला जाई. एखाद्या नाच्याने स्त्री भूमिका हुबेहुब वठविल्यास त्याला राजदरबारी बक्षिस देखील दिले जात असे. यासंदर्भात दगडूबाबा साळी यांचे उदारण बोलके आहे. शिमग्याच्या वेळी बडोदे संस्थानमध्ये त्यांनी तमाशा सादर करताना गरोदर बाईचे सोंग वठविले व बडोद्याच्या राणी सरकारांनी दगडूबाबांना सोन्याचे कडे बहाल केले. चंद्राबाई आणि पवळाबाई या ढोलकी-फडाच्या तमाशातील पहिल्या नाच्या म्हणून ओळखल्या जातात. चंद्राबाईने पठ्ठे बापूराव तसेच दगडूबाबा साळी यांच्या तमाशात काम केले होते. भाऊ फक्कड, दादू तुळपूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आदी तमाशा कलावंत नाच्ये म्हणून प्रख्यात होते. तमाशात नाच्ये इतके लोकप्रिय असत व ते इतके देखणे असत की तमाशा सुरू होताना 'हिलाळाने` त्यांची दृष्टी काढली जायची.

लोकसंस्कृतीचे उपासक या ग्रंथात डॉ. रा. चि. ढेरे यांनी स्त्री वेशधारी पुरूषाने वठविलेल्या सोंगा बदद्ल विवेचन केलेले आहे ते असे-
''रूप करणे` म्हणजे सोंग आणणे हा वाक्प्राचार यादवकालीन वाङमयात अनेकवार आलेला आहे. सोंग आणि त्यांची संपादणी यांचे उल्लेखही पूर्व काळापासून आढळतात. नाथांच्या गुरूला गुरूबंधू शेख महंमदबाबा श्रीगोदेकर हा निर्गुणोपास-कबिरासारखा मुक्त चिंतक. त्याने सगुणसंकीर्तनाच्या नावावर चालणा-या सर्व प्रकारांवर हल्ला चढविला आहे. देवाचे चरित्र श्रोत्यांपुढे साक्षात उभे करण्याच्या निमित्ताने हरिकथेत जो 'लालम लाल` सादर केला जातो, त्याने विषयदिप अधिकच भडकतो, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. देवचरित्राला नाटयरूप देण्याच्या निमित्ताने, पुरूषाने स्त्रीवेश घेऊन नटण्याचा जो प्रकार त्याच्या काळी रूढ होता, त्यावर त्याने हल्ला चढविला आहे. अशा प्रकारे स्त्रीवेषाने नटणा-याला शेख मंहम्मदाने 'नटया` ('नट` या शब्दाचे तुच्छता दर्शक पुल्लिंगी एकवचनी रूप) असा शब्द वापरला आहे. नटया म्हणजे नाच्या. शेख महंमदाने नटयाचे जे वर्णन केले आहे, ते प्रत्ययकारी आहे-

क्षौर करूनि डोळां काजळ। दिसे स्त्रीहूनि देह ढाळ।
तेथें पाहतां करिती तळमळ। महाव्यसनी उन्मत्त ।।
बाप पुत्र जांवई पिशुन। सासरा भाचा मेहुणा बंधुजन।
नातू चुलता साडू सोयरे सज्जन। पापरूपें पाहाती।।
अवघेचिं पातले चंचल अनुसंधानीं।
मागे सांगितली नातीं गेली मोडूनी।
अवघे काया होत एकमेकांलागुनी। ते ओळखावे श्रोतेजनीं।।
पुरूष स्त्रीरूपे नाटया नटला। पापरूपें सभेनें अभिलाषिला।
तों पापाचा संग्रह प्रबळ जाला। मृगजळ जैसा डोहो।।
नटया देखोनि ईश्वराते ध्यातु। ऐसा विरळ कोणी पुण्यवंतु।
येर भूतें जैसा अवगुणाइतु। टकमकां पाहाती।।

11:43 PM

तुका झालासे कळस !




थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ''मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत', उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच 'मर्‍हाठियेची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु हवा' अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्री ज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ, महाराष्ट्रधर्म वाढवावा अशी तळमळ बाळगणारे समर्थ रामदास आणि प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्विचारांचे अभंगामृत ठेवणारे तुकोबा ! ही आणि अशीच संतपरंपरा हे आपले अमोल धन आहे. ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

आपले संत हे केवळ विविध जातीधर्मातूनच आले असे नव्हे तर ते समाजाच्या विविध स्तरांमधूनही आले आहेत आणि त्यांनी आपापल्या व्यवहारात, आपापल्या कामकाजात परमेश्वराचे स्वरूप पाहिले आहे. त्यांनी देवाला बरोबर ओळखले आहे. आपले संत हे तसे अंधश्रद्ध नाहीत. उलट आपल्या सर्व संतांनी जागोजागी अंधश्रद्धेविरुद्ध आपले मत नोंदविले आहे. लोकशिक्षणाची आणि जनजागृतीची त्यांची तळमळ शब्दाशब्दांतून ओसंडत असते. आपण स्वत: भगवंतप्राप्तीचा मार्ग यशस्वीपणे अनुसरला ह्यातच केवळ संतोष न मानता इतरांनाही हा आनंद लुटू द्यावा, अशी ह्या सर्व संतांची धारणा आहे.

''नको सेवू वन, नको सांडू अन्न चिंती नारायण सर्वांठायी'' 'असा संदेश प्रत्येक संताने आपल्या लिहिण्या बोलण्यातून दिलेला आहे. प्रपंचात आणि परमार्थात श्रेष्ठपदी पोहोचलेल्या वेगवेगळ्या संतांनी महाराष्ट्रातील पिढ्यापिढ्यांच्या हिताची काळजी वाहिली, तुमच्या-आमच्या सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली, हे खरोखरच ह्या मातीत जन्मणार्‍या प्रत्येकाचे थोर भाग्यच नव्हे काय ?' तुकोबांची गाथा हा मराठी साहित्यशारदेचा अमोल अलंकार आहे. तुकाराम महाराज आकाशाएवढे मोठे झाले होते. म्हणून ते पुढील पिढ्यांच्या उपकारापुरते उरले. विष्णुदास म्हणून ते मऊ मेणाहून असले तरी प्रसंगी वज्राहून कठीण होण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वात होती. सोने आणि मृत्तिका एकाच दृष्टीने पाहणारे तुकोबा शब्दांच्या सामर्थ्याला मात्र पुरेपूर ओळखतात आणि ''आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने'' असे अभिमानाने सांगतात.

''जे जे भेटे भूत ते जाणावे भगवंत'' एवढे सांगून तुकोबा थांबत नाहीत, तर वृक्षवल्लीसुद्धा आमची सोयरी आहेत, असे म्हणून विश्वबंधुत्वाची मर्यादा सर्व चराचरापर्यंत नेऊन पोहोचवतात. आपल्याला पाहून शेतात दाणे टिपणारे पक्षी उडून गेले म्हणून तुकोबा बेचैन होतात. तुकोबांना आस एकच, श्रीविठ्ठलकृपेची ! म्हणून मायाजाळात न गुंतता परमार्थ साधनेचा मार्ग अनुसरला पाहिजे ह्या गोष्टीवर ते अधिक भर देतात. ''तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने'' अशी त्यांची तळमळ आहे. ''सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती'' हीच त्यांची प्रार्थना आहे. तुकोबा त्या काळच्या रूढ अर्थाने शिकलेले पंडित नव्हते, पण संसाराच्या पाठशाळेत त्यांना जे धडे मिळाले त्यापासून जमा केलेले अनुभवाचे नवनीत त्यांनी आपल्या अभंगांच्या रूपाने शब्दबद्ध करून ठेवले. म्हणून तर ''तुका झालासे कळस'' असे सार्थपणे म्हणावयाचे !

11:36 PM

गणपती पुळे



गणपती ही पुरातन काळापासून द्वारपाल देवता राहिली आहे. म्हणूनच भारतामध्ये चार दिशांना चार अशी गणपतीची महास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपती पुळे.

विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी पोफळीची दाटीवाटीने उभी असलेली झाडे असा सुंदर निसर्ग लाभलेले हे गणपती स्थान पर्यटनाच्या दृष्टीने देखील लोकप्रिय आहे.

गणपती पुळे हे लोकप्रिय ठिकाण रत्नागिरीच्या उत्तरेला आहे. या ठिकाणचा उल्लेख मुद्गल पुराणामध्येही आला आहे. पुळे हे नाव पडले ते इथे असलेल्या समुद्र किनार्‍यामुळेच कारण, पुलीन म्हणजे वाळवंट, आणि हे गणपतीस्थान समुद्रकाठच्या वाळूवर वसलेले असल्यामुळे याचे नाव पडले गणपती पुळे. या मंदिरामागे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की परशुरामाची गणपतीवर अत्यंत श्रद्धा होती. त्याने आपल्या उपासनेसाठी सागर हटवून परशुराम क्षेत्र निर्माण केले आणि आपल्या उपासनेसाठी गणपतीचे तिथे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन गणपतीने इथे माझे अस्तित्व एकदंत, दोन गंडस्थळ, नाभी आणि पर्वतरुपाने राहिल, असा दृष्टांत दिला. तेव्हापासून इथे गणपतीची उपासना केली जाते. गणपती पुळ्याच्या या मंदिराला शिवाजी महाराजांनी आणि पेशव्यांनी देणग्या दिल्या होत्या.

गणपतीचे हे मंदिर समुद्रकिनार्‍यावर आहे. भव्य सभामंडप आहे. पण गाभारा दगडी असून अत्यंत लहान आहे. गणपतीचे दर्शन वाकूनच घ्यावे लागते. इथे गणपतीची चार हात, आयुधे घेतलेली अशी मूर्ती नसून फक्त दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत एवढेच ठळक वैशिष्ट्ये असलेली मूर्ती आहे. या मूर्तीला चंदनाच्या गंधाचे सोंड, डोळे, कान यांचे रोज आकर्षकपणे आरेखन केले जाते. मंदिराचे तोंड पश्चिमेला आहे.

मंदिराचा शांत निवांत परिसर बघताक्षणीच मन हरखून जाते. मंदिराला प्रदक्षिणा घालायची तर ती संपूर्ण टेकडीलाच घालावी लागते. प्रदक्षिणेचा हा मार्ग साधारण अर्ध्या मैलाचा आहे. प्रदक्षिणा मार्गावर संपूर्ण फरसबंदी केलेली आहे. ही प्रदक्षिणा घालणे हा पण एक सुंदर अनुभव आहे. कारण प्रदक्षिणा पूर्ण टेकडीलाच घालावी लागते. आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गात क्षणोक्षणी भेटीला येणारे समुद्र, नारळी पोफळीची झाडं यांचे अनेक देखावे मनाला आनंद देतात. परिसरात कौलारू घरं आहेत. समुद्राकाठची शुभ्र चमचमती वाळू, फेसाळणारा समुद्र आणि ही कौलारु घरं यांचे जिवंत पोर्ट्रेट मनाला सुखावणारा आहे.

मंदिराच्या सभामंडपात बसले तरी समुद्राची गाज सतत कानी पडते आणि तिथे निवांत बसून समुद्र न्याहाळणे ही देखील एख गंमत आहे. या सार्‍यामुळेच इथे पर्यटकांची कायम गर्दी असते. मंदिरात भाद्रपद चतुर्थी आणि माघ महिन्यातल्या चतुर्थीला मोठे उत्सव होतात. यावेळी मंदिरातल्या चांदीच्या गणपतीची पालखी प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येते. सुरेख समुद्र किनारा लाभलेले, गणपतीचे हे महाद्वार आकर्षक निसर्ग आणि स्थानाच्या पावित्र्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.

9:58 PM

प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ मध्ये झाल्याची नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

''जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि 'आ' रानमोळी''


अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रूंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

असं म्हणतात की, १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.
प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.