11:48 PM

'नाच्या`
'खेळ तो येणेची खेळावा ,
नट तो येणेची नटावा,


अशा स्वरूपाचे एक संतवचन आहे. अर्धनारी नटेश्वराची संकल्पना भारतीय संस्कृतीत रूढ असून 'सत्यम,शिवम, सुंदरम्` चा प्रत्यय या अर्धनारीनटेश्वरामध्ये येतो असे म्हणतात. भरतमुनींच्या नाटयशास्त्रात आहार्य, आंगिक, वाचिक असे अभिनय प्रकार विषद केलेले आहेत आणि अभिनयासोबत नृत्य आणि नृत हा विचार मांडला गेला आहे. नृत्य करणा-या स्त्रीला 'नर्तिका` तर नृत्य करणा-या पुरूषाला 'नर्तक` असे म्हटले जाते. लोकधाटी परंपरेत नर्तिका आणि नर्तक हे शिष्ट शब्द अनुक्रमे 'नाची आणि 'नाच्या` म्हणून संबोधले जातात. नाच्याची परंपरा ढोलकी फडाच्या तमाशात आहे. तशीच ती खडीगंमत आणि आदिवासी ठाकर समाजाच्या तमाशात आढळून येते.

लोककला प्रकारांमध्ये स्त्री अथवा पुरूष यांचे नर्तन मंदिर परिसरातील भक्तीनाटयांमध्ये, अंगणीय आणि प्रांगणीय कलाप्रकारांमध्ये आढळून येते. पण या कलाकारांना नाची किंवा नाच्या म्हणून संबोधले जात नाही. मंदिर परिसरात नृत्य करणा-या स्त्री कलावंत या प्रामुख्याने देवदासी परंपरेतल्या असतात. ज्यांत भाविणी, मुरळया, जोगतिणी, जान्या आदींचा अंतर्भाव असतो. या स्त्रिया जरी नृत्य करीत असल्या तरी त्याना नाची म्हणून संबोधले जात नाही. केवळ तमाशातील स्त्रीलाच नाची म्हणून संबोधले जाते. नाची किंवा नाच्या या स्वरूपाचे संबोधन फार आदरयुक्त म्हणून मानले जात नसेल, तरी एकेकाळी आपण तमाशातील नाची अथवा नाच्या आहोत असा उल्लेख गौरवाने केला जाई. एखाद्या नाच्याने स्त्री भूमिका हुबेहुब वठविल्यास त्याला राजदरबारी बक्षिस देखील दिले जात असे. यासंदर्भात दगडूबाबा साळी यांचे उदारण बोलके आहे. शिमग्याच्या वेळी बडोदे संस्थानमध्ये त्यांनी तमाशा सादर करताना गरोदर बाईचे सोंग वठविले व बडोद्याच्या राणी सरकारांनी दगडूबाबांना सोन्याचे कडे बहाल केले. चंद्राबाई आणि पवळाबाई या ढोलकी-फडाच्या तमाशातील पहिल्या नाच्या म्हणून ओळखल्या जातात. चंद्राबाईने पठ्ठे बापूराव तसेच दगडूबाबा साळी यांच्या तमाशात काम केले होते. भाऊ फक्कड, दादू तुळपूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आदी तमाशा कलावंत नाच्ये म्हणून प्रख्यात होते. तमाशात नाच्ये इतके लोकप्रिय असत व ते इतके देखणे असत की तमाशा सुरू होताना 'हिलाळाने` त्यांची दृष्टी काढली जायची.

लोकसंस्कृतीचे उपासक या ग्रंथात डॉ. रा. चि. ढेरे यांनी स्त्री वेशधारी पुरूषाने वठविलेल्या सोंगा बदद्ल विवेचन केलेले आहे ते असे-
''रूप करणे` म्हणजे सोंग आणणे हा वाक्प्राचार यादवकालीन वाङमयात अनेकवार आलेला आहे. सोंग आणि त्यांची संपादणी यांचे उल्लेखही पूर्व काळापासून आढळतात. नाथांच्या गुरूला गुरूबंधू शेख महंमदबाबा श्रीगोदेकर हा निर्गुणोपास-कबिरासारखा मुक्त चिंतक. त्याने सगुणसंकीर्तनाच्या नावावर चालणा-या सर्व प्रकारांवर हल्ला चढविला आहे. देवाचे चरित्र श्रोत्यांपुढे साक्षात उभे करण्याच्या निमित्ताने हरिकथेत जो 'लालम लाल` सादर केला जातो, त्याने विषयदिप अधिकच भडकतो, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. देवचरित्राला नाटयरूप देण्याच्या निमित्ताने, पुरूषाने स्त्रीवेश घेऊन नटण्याचा जो प्रकार त्याच्या काळी रूढ होता, त्यावर त्याने हल्ला चढविला आहे. अशा प्रकारे स्त्रीवेषाने नटणा-याला शेख मंहम्मदाने 'नटया` ('नट` या शब्दाचे तुच्छता दर्शक पुल्लिंगी एकवचनी रूप) असा शब्द वापरला आहे. नटया म्हणजे नाच्या. शेख महंमदाने नटयाचे जे वर्णन केले आहे, ते प्रत्ययकारी आहे-

क्षौर करूनि डोळां काजळ। दिसे स्त्रीहूनि देह ढाळ।
तेथें पाहतां करिती तळमळ। महाव्यसनी उन्मत्त ।।
बाप पुत्र जांवई पिशुन। सासरा भाचा मेहुणा बंधुजन।
नातू चुलता साडू सोयरे सज्जन। पापरूपें पाहाती।।
अवघेचिं पातले चंचल अनुसंधानीं।
मागे सांगितली नातीं गेली मोडूनी।
अवघे काया होत एकमेकांलागुनी। ते ओळखावे श्रोतेजनीं।।
पुरूष स्त्रीरूपे नाटया नटला। पापरूपें सभेनें अभिलाषिला।
तों पापाचा संग्रह प्रबळ जाला। मृगजळ जैसा डोहो।।
नटया देखोनि ईश्वराते ध्यातु। ऐसा विरळ कोणी पुण्यवंतु।
येर भूतें जैसा अवगुणाइतु। टकमकां पाहाती।।

0 comments: