11:53 PM

शिर्डी आणि साईबाबा



शिर्डी आणि साईबाबा
ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो अशी समानतेची शिकवण देणारे आधुनिक संत शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्या वास्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावाला जागतिक ओळख दिली.

शिर्डी आणि साईबाबा हे आता समानार्थी शब्द झाले आहेत. साईबाबांचे हे मंदिर गावाच्या मध्यभागी वसले आहे. याशिवाय साईबाबाच्या वास्तव्याने पावन झालेल्या खंडोबा मंदिर, द्वारकामाई, चावडी अशा ठिकाणांना रोज हजारो भक्त भेट देतात. समाधीमंदिर हे मुख्य ठिकाण. याठिकाणी पुर्वी वाडा होता. साईबाबांचे वास्तव्य अखेरच्या काही दिवसात इथे होते. इथे साईबाबांची समाधी आहे. या मंदिरात शांत निवांतपणे बसलेल्या स्थितीतली पांढर्‍या शुभ्र संगमरवराची साईबाबांची मूर्ती आहे. समाधी मंदिराचे नित्य उपक्रम सकाळी ५ वा. सुरू होतात. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घुमणारे भुपाळी स्वरांनी भक्त मंदिराकडे साईबाबांच्या ओढीने खेचला जातो.

याशिवाय भक्त दर्शन घेतात ते खंडोबा मंदिराचे. हे तेच मंदिर आहे ज्याठिकाणी साईबाबांनी शिर्डीत सर्वप्रथम दर्शन दिले होते. असे सांगतात की या मंदिराचे विश्वस्य आसलेल्या म्हाळसापती सोनारांनी कफनी घातलेल्या दाढी वाढलेल्या साईबाबांना पाहताक्षणी `या! साई` अशी हाक मारली आणि तेव्हापासून ते साईबाबा याच नावाने भक्तांना परिचित झाले. इथे एक मोठे वडाचे झाड आहे. आता इथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यात साईबाबांच्या पादुका ठेवल्या आहेत.

त्यानंतर गुरुस्थानाचे दर्शन भक्त मोठ्या श्रध्देने घेतात. साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे याठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुची समाधी आहे. इथे अजूनही ते कडुनिंबाचे झाड बहरले आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि साईबाबांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर दर मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी धुनी पेटवण्यात येते. गुरुस्थान हे आत्मीक शांती देणारे ठिकाण आहे.

द्वारकामाई! हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण. साईबाबा जिथे राहायचे त्या ठिकाणाला ते द्वारकामाई म्हणून संबोधायचे. असं सांगतात की, साईबाबा लग्नाच्या वर्‍हाडासोबत शिर्डीला आले आणि उतरले ते याच ठिकाणी आणि अखेरपर्यंत ते इथेच राहिले. इथल्या धुनीची उदी भक्तांना द्यायचे. द्वारकामाईला लागून एक संग्रहालय साई संस्थानाने विकसित केले आहे. याठिकाणी साईबाबांच्या रोजच्या वापरातले पाण्याचे भांडे, कांबळे, जाते इ.वस्तू ठेवल्या आहेत. शिवाय ज्या दगडावर बसून साईबाबा भक्तांचे दु:ख निवारत तो मोठा दगडही इथे ठेवला आहे. साईबाबांचे एक मोठे पोट्रेट याठिकाणी आहे.

ज्या ठिकाणी साईबाबा झोपायचे त्याठिकाणाला ते चावडी म्हणायचे. ही चावडी द्वारकामाईला लागूनच आहे. इथेही साईबाबांचे एक मोठे पोट्रेट लावले आहे. समाधी मंदिर आणि इतर संबंधित ठिकाणांचे दर्शन एक आत्मशांतीचा अनुभवन देणारे आहे.

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

11:48 PM

'नाच्या`




'खेळ तो येणेची खेळावा ,
नट तो येणेची नटावा,


अशा स्वरूपाचे एक संतवचन आहे. अर्धनारी नटेश्वराची संकल्पना भारतीय संस्कृतीत रूढ असून 'सत्यम,शिवम, सुंदरम्` चा प्रत्यय या अर्धनारीनटेश्वरामध्ये येतो असे म्हणतात. भरतमुनींच्या नाटयशास्त्रात आहार्य, आंगिक, वाचिक असे अभिनय प्रकार विषद केलेले आहेत आणि अभिनयासोबत नृत्य आणि नृत हा विचार मांडला गेला आहे. नृत्य करणा-या स्त्रीला 'नर्तिका` तर नृत्य करणा-या पुरूषाला 'नर्तक` असे म्हटले जाते. लोकधाटी परंपरेत नर्तिका आणि नर्तक हे शिष्ट शब्द अनुक्रमे 'नाची आणि 'नाच्या` म्हणून संबोधले जातात. नाच्याची परंपरा ढोलकी फडाच्या तमाशात आहे. तशीच ती खडीगंमत आणि आदिवासी ठाकर समाजाच्या तमाशात आढळून येते.

लोककला प्रकारांमध्ये स्त्री अथवा पुरूष यांचे नर्तन मंदिर परिसरातील भक्तीनाटयांमध्ये, अंगणीय आणि प्रांगणीय कलाप्रकारांमध्ये आढळून येते. पण या कलाकारांना नाची किंवा नाच्या म्हणून संबोधले जात नाही. मंदिर परिसरात नृत्य करणा-या स्त्री कलावंत या प्रामुख्याने देवदासी परंपरेतल्या असतात. ज्यांत भाविणी, मुरळया, जोगतिणी, जान्या आदींचा अंतर्भाव असतो. या स्त्रिया जरी नृत्य करीत असल्या तरी त्याना नाची म्हणून संबोधले जात नाही. केवळ तमाशातील स्त्रीलाच नाची म्हणून संबोधले जाते. नाची किंवा नाच्या या स्वरूपाचे संबोधन फार आदरयुक्त म्हणून मानले जात नसेल, तरी एकेकाळी आपण तमाशातील नाची अथवा नाच्या आहोत असा उल्लेख गौरवाने केला जाई. एखाद्या नाच्याने स्त्री भूमिका हुबेहुब वठविल्यास त्याला राजदरबारी बक्षिस देखील दिले जात असे. यासंदर्भात दगडूबाबा साळी यांचे उदारण बोलके आहे. शिमग्याच्या वेळी बडोदे संस्थानमध्ये त्यांनी तमाशा सादर करताना गरोदर बाईचे सोंग वठविले व बडोद्याच्या राणी सरकारांनी दगडूबाबांना सोन्याचे कडे बहाल केले. चंद्राबाई आणि पवळाबाई या ढोलकी-फडाच्या तमाशातील पहिल्या नाच्या म्हणून ओळखल्या जातात. चंद्राबाईने पठ्ठे बापूराव तसेच दगडूबाबा साळी यांच्या तमाशात काम केले होते. भाऊ फक्कड, दादू तुळपूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आदी तमाशा कलावंत नाच्ये म्हणून प्रख्यात होते. तमाशात नाच्ये इतके लोकप्रिय असत व ते इतके देखणे असत की तमाशा सुरू होताना 'हिलाळाने` त्यांची दृष्टी काढली जायची.

लोकसंस्कृतीचे उपासक या ग्रंथात डॉ. रा. चि. ढेरे यांनी स्त्री वेशधारी पुरूषाने वठविलेल्या सोंगा बदद्ल विवेचन केलेले आहे ते असे-
''रूप करणे` म्हणजे सोंग आणणे हा वाक्प्राचार यादवकालीन वाङमयात अनेकवार आलेला आहे. सोंग आणि त्यांची संपादणी यांचे उल्लेखही पूर्व काळापासून आढळतात. नाथांच्या गुरूला गुरूबंधू शेख महंमदबाबा श्रीगोदेकर हा निर्गुणोपास-कबिरासारखा मुक्त चिंतक. त्याने सगुणसंकीर्तनाच्या नावावर चालणा-या सर्व प्रकारांवर हल्ला चढविला आहे. देवाचे चरित्र श्रोत्यांपुढे साक्षात उभे करण्याच्या निमित्ताने हरिकथेत जो 'लालम लाल` सादर केला जातो, त्याने विषयदिप अधिकच भडकतो, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. देवचरित्राला नाटयरूप देण्याच्या निमित्ताने, पुरूषाने स्त्रीवेश घेऊन नटण्याचा जो प्रकार त्याच्या काळी रूढ होता, त्यावर त्याने हल्ला चढविला आहे. अशा प्रकारे स्त्रीवेषाने नटणा-याला शेख मंहम्मदाने 'नटया` ('नट` या शब्दाचे तुच्छता दर्शक पुल्लिंगी एकवचनी रूप) असा शब्द वापरला आहे. नटया म्हणजे नाच्या. शेख महंमदाने नटयाचे जे वर्णन केले आहे, ते प्रत्ययकारी आहे-

क्षौर करूनि डोळां काजळ। दिसे स्त्रीहूनि देह ढाळ।
तेथें पाहतां करिती तळमळ। महाव्यसनी उन्मत्त ।।
बाप पुत्र जांवई पिशुन। सासरा भाचा मेहुणा बंधुजन।
नातू चुलता साडू सोयरे सज्जन। पापरूपें पाहाती।।
अवघेचिं पातले चंचल अनुसंधानीं।
मागे सांगितली नातीं गेली मोडूनी।
अवघे काया होत एकमेकांलागुनी। ते ओळखावे श्रोतेजनीं।।
पुरूष स्त्रीरूपे नाटया नटला। पापरूपें सभेनें अभिलाषिला।
तों पापाचा संग्रह प्रबळ जाला। मृगजळ जैसा डोहो।।
नटया देखोनि ईश्वराते ध्यातु। ऐसा विरळ कोणी पुण्यवंतु।
येर भूतें जैसा अवगुणाइतु। टकमकां पाहाती।।

11:43 PM

तुका झालासे कळस !




थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. ''मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत', उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच 'मर्‍हाठियेची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु हवा' अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्री ज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ, महाराष्ट्रधर्म वाढवावा अशी तळमळ बाळगणारे समर्थ रामदास आणि प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्विचारांचे अभंगामृत ठेवणारे तुकोबा ! ही आणि अशीच संतपरंपरा हे आपले अमोल धन आहे. ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

आपले संत हे केवळ विविध जातीधर्मातूनच आले असे नव्हे तर ते समाजाच्या विविध स्तरांमधूनही आले आहेत आणि त्यांनी आपापल्या व्यवहारात, आपापल्या कामकाजात परमेश्वराचे स्वरूप पाहिले आहे. त्यांनी देवाला बरोबर ओळखले आहे. आपले संत हे तसे अंधश्रद्ध नाहीत. उलट आपल्या सर्व संतांनी जागोजागी अंधश्रद्धेविरुद्ध आपले मत नोंदविले आहे. लोकशिक्षणाची आणि जनजागृतीची त्यांची तळमळ शब्दाशब्दांतून ओसंडत असते. आपण स्वत: भगवंतप्राप्तीचा मार्ग यशस्वीपणे अनुसरला ह्यातच केवळ संतोष न मानता इतरांनाही हा आनंद लुटू द्यावा, अशी ह्या सर्व संतांची धारणा आहे.

''नको सेवू वन, नको सांडू अन्न चिंती नारायण सर्वांठायी'' 'असा संदेश प्रत्येक संताने आपल्या लिहिण्या बोलण्यातून दिलेला आहे. प्रपंचात आणि परमार्थात श्रेष्ठपदी पोहोचलेल्या वेगवेगळ्या संतांनी महाराष्ट्रातील पिढ्यापिढ्यांच्या हिताची काळजी वाहिली, तुमच्या-आमच्या सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली, हे खरोखरच ह्या मातीत जन्मणार्‍या प्रत्येकाचे थोर भाग्यच नव्हे काय ?' तुकोबांची गाथा हा मराठी साहित्यशारदेचा अमोल अलंकार आहे. तुकाराम महाराज आकाशाएवढे मोठे झाले होते. म्हणून ते पुढील पिढ्यांच्या उपकारापुरते उरले. विष्णुदास म्हणून ते मऊ मेणाहून असले तरी प्रसंगी वज्राहून कठीण होण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वात होती. सोने आणि मृत्तिका एकाच दृष्टीने पाहणारे तुकोबा शब्दांच्या सामर्थ्याला मात्र पुरेपूर ओळखतात आणि ''आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने'' असे अभिमानाने सांगतात.

''जे जे भेटे भूत ते जाणावे भगवंत'' एवढे सांगून तुकोबा थांबत नाहीत, तर वृक्षवल्लीसुद्धा आमची सोयरी आहेत, असे म्हणून विश्वबंधुत्वाची मर्यादा सर्व चराचरापर्यंत नेऊन पोहोचवतात. आपल्याला पाहून शेतात दाणे टिपणारे पक्षी उडून गेले म्हणून तुकोबा बेचैन होतात. तुकोबांना आस एकच, श्रीविठ्ठलकृपेची ! म्हणून मायाजाळात न गुंतता परमार्थ साधनेचा मार्ग अनुसरला पाहिजे ह्या गोष्टीवर ते अधिक भर देतात. ''तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने'' अशी त्यांची तळमळ आहे. ''सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती'' हीच त्यांची प्रार्थना आहे. तुकोबा त्या काळच्या रूढ अर्थाने शिकलेले पंडित नव्हते, पण संसाराच्या पाठशाळेत त्यांना जे धडे मिळाले त्यापासून जमा केलेले अनुभवाचे नवनीत त्यांनी आपल्या अभंगांच्या रूपाने शब्दबद्ध करून ठेवले. म्हणून तर ''तुका झालासे कळस'' असे सार्थपणे म्हणावयाचे !

11:36 PM

गणपती पुळे



गणपती ही पुरातन काळापासून द्वारपाल देवता राहिली आहे. म्हणूनच भारतामध्ये चार दिशांना चार अशी गणपतीची महास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपती पुळे.

विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी पोफळीची दाटीवाटीने उभी असलेली झाडे असा सुंदर निसर्ग लाभलेले हे गणपती स्थान पर्यटनाच्या दृष्टीने देखील लोकप्रिय आहे.

गणपती पुळे हे लोकप्रिय ठिकाण रत्नागिरीच्या उत्तरेला आहे. या ठिकाणचा उल्लेख मुद्गल पुराणामध्येही आला आहे. पुळे हे नाव पडले ते इथे असलेल्या समुद्र किनार्‍यामुळेच कारण, पुलीन म्हणजे वाळवंट, आणि हे गणपतीस्थान समुद्रकाठच्या वाळूवर वसलेले असल्यामुळे याचे नाव पडले गणपती पुळे. या मंदिरामागे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की परशुरामाची गणपतीवर अत्यंत श्रद्धा होती. त्याने आपल्या उपासनेसाठी सागर हटवून परशुराम क्षेत्र निर्माण केले आणि आपल्या उपासनेसाठी गणपतीचे तिथे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन गणपतीने इथे माझे अस्तित्व एकदंत, दोन गंडस्थळ, नाभी आणि पर्वतरुपाने राहिल, असा दृष्टांत दिला. तेव्हापासून इथे गणपतीची उपासना केली जाते. गणपती पुळ्याच्या या मंदिराला शिवाजी महाराजांनी आणि पेशव्यांनी देणग्या दिल्या होत्या.

गणपतीचे हे मंदिर समुद्रकिनार्‍यावर आहे. भव्य सभामंडप आहे. पण गाभारा दगडी असून अत्यंत लहान आहे. गणपतीचे दर्शन वाकूनच घ्यावे लागते. इथे गणपतीची चार हात, आयुधे घेतलेली अशी मूर्ती नसून फक्त दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत एवढेच ठळक वैशिष्ट्ये असलेली मूर्ती आहे. या मूर्तीला चंदनाच्या गंधाचे सोंड, डोळे, कान यांचे रोज आकर्षकपणे आरेखन केले जाते. मंदिराचे तोंड पश्चिमेला आहे.

मंदिराचा शांत निवांत परिसर बघताक्षणीच मन हरखून जाते. मंदिराला प्रदक्षिणा घालायची तर ती संपूर्ण टेकडीलाच घालावी लागते. प्रदक्षिणेचा हा मार्ग साधारण अर्ध्या मैलाचा आहे. प्रदक्षिणा मार्गावर संपूर्ण फरसबंदी केलेली आहे. ही प्रदक्षिणा घालणे हा पण एक सुंदर अनुभव आहे. कारण प्रदक्षिणा पूर्ण टेकडीलाच घालावी लागते. आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गात क्षणोक्षणी भेटीला येणारे समुद्र, नारळी पोफळीची झाडं यांचे अनेक देखावे मनाला आनंद देतात. परिसरात कौलारू घरं आहेत. समुद्राकाठची शुभ्र चमचमती वाळू, फेसाळणारा समुद्र आणि ही कौलारु घरं यांचे जिवंत पोर्ट्रेट मनाला सुखावणारा आहे.

मंदिराच्या सभामंडपात बसले तरी समुद्राची गाज सतत कानी पडते आणि तिथे निवांत बसून समुद्र न्याहाळणे ही देखील एख गंमत आहे. या सार्‍यामुळेच इथे पर्यटकांची कायम गर्दी असते. मंदिरात भाद्रपद चतुर्थी आणि माघ महिन्यातल्या चतुर्थीला मोठे उत्सव होतात. यावेळी मंदिरातल्या चांदीच्या गणपतीची पालखी प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येते. सुरेख समुद्र किनारा लाभलेले, गणपतीचे हे महाद्वार आकर्षक निसर्ग आणि स्थानाच्या पावित्र्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.

9:58 PM

प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ मध्ये झाल्याची नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

''जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि 'आ' रानमोळी''


अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.

अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रूंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

असं म्हणतात की, १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.
प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.