12:19 AM

हरिश्चंद्रगड




पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटाची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिरवरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते.

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.

हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

12:09 AM

अखंड सावधान असावें




नारायण सूर्याजीपंत ठोसर या नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. लग्नाचे विधी सुरू झाले. मुलासमोर अंतरपाट धरला गेला. मुलीला आणून उभे केले. मंगलाष्टके सुरु झाली आणि मंगलाष्टकातील 'शुभमंगल सावधान' हे शब्द ऐकताच तो बारा वर्षांचा मुलगा एकदम 'सावध' झाला आणि या भरल्या लग्नमंडपातूनच त्याने धूम ठोकली. त्याला सांसारिक प्रपंचात रस नव्हता. विश्वाचा प्रपंच आपण करावा, अशी ओढ त्याला अगदी कोवळ्या बालपणातच लागलेली होती. या ओढीने त्याला लग्नमंडपातून खेचून नेले. त्याच्या हातून तपश्चर्या घडली. अनुष्ठाने घडली आणि तो मुलगा श्रीसमर्थ रामदासस्वामी म्हणून जगाला ज्ञात झाला.

विवाहमंडपात ऐकलेले 'सावधान' हे शब्द अवधान म्हणजे लक्ष आणि सावधान म्हणजे लक्षपूर्वक हा अर्थ त्याने मनाच्या गाभार्‍यात इतका जपून ठेवला की सावधानतेची शिकवणूक आयुष्यभर विविध प्रसंगी या मुलाने महाराष्ट्राला दिली. 'सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळ मोक्ष इतरास ते अलक्ष लक्षिले नवजे' मोक्ष मिळवावयाचा असेल तर, सावध, साक्षेपी आणि दक्ष राहाणे आवश्यक आहे. हे समर्थ परखडपणे सांगतात. 'सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयाशी साधन सायास करणेचि न लगे' असा समर्थांचा स्वानुभवपूर्ण निर्वाळा आहे. समर्थ स्वत: तर सावधानपणे वागलेच पण या महाराष्ट्रालाही त्यांनी सावधानतेचा मंत्र दिला.

समर्थानी रूढ अर्थाने संसाराचा त्याग केला होता. पण त्यांच्याजवळ जी कुबडी होती तिच्यात गुप्ती दडवलेली असे. ही त्यांच्या अखंड सावधानतेची एक प्रकारे निशाणी होय आणि त्यांचे हे सावधानपण सगळ्या ठिकाणी होते. खबरदारी आणि वेगी तेणे सामर्थ्य चढे अंगी असा उपदेश समर्थांनी केला आहे. आणि 'इशारतीचे बोलू नये बोलायाचे लिहू नये लिहावयाचे सांगू नये जबाबीनें असे व्यवहाराचे शाश्वत सूत्रही पुढल्या पिढीसाठी शब्दबद्ध करून ठेवले आहे. प्रपंचातही हे सावधानपण किती आवश्यक असते ते सांगताना समर्थ म्हणतात, सावधानपणे प्रपंच केला तेणें सुखचि पावला दीर्घ प्रयत्ने मांडला कार्यभाग साधे आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा नव्या पिढीला आदेश देतांना 'विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाचि करणे' या शब्दात सावधपणे वागण्याची आवश्यकता समर्थांनी प्रतिपादिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाल्यानंतर समर्थांनी संभाजी महाराजांना ज्या पत्राद्वारे उपदेश केला त्या पत्राचा प्रारंभच मुळी 'अखंड सावधान असावें दुश्चित कदापि नसावें तजवीजा करीत बसावें एकंत स्थळीं' 'अखंड सावधान असावे' असा सल्ला किंवा उपदेश जो समर्थांनी दिला होता तो दुर्लक्षित झाल्यामुळेच की काय संभाजी महाराजांना एका दुष्ट कारस्थानाला बळी पडावे लागले आणि या तडफदार, शूर आणि कर्तबगार राजाला महाराष्ट्राला मुकावे लागले.