3:14 AM

श्री विघ्नेश्वर - ओझर




भक्तानुग्रह गजमुखो विघ्नेश्वरो वस्मप: ।
नाना मूर्तीधरोऽपि नैजमशीमाऽ खंड: सदात्म प्रभू ।।
स्वेच्छा विघ्नदर सदासुखकर सिद्ध: कलौ स्वेपुय: ।
क्षेत्रे ओझर के नमोऽस्तु सततं तस्मै परब्रह्मणे ।।७।।

अर्थात - ज्याचे मुख हत्तीसारखे आहे. जो भक्तांवर कृपा करतो, जो विघ्न हरण करतो, जो मोक्ष देतो, ज्याने विविध रूपे धारण करूनही ज्या सर्व श्रेष्ठ परमेश्वराचा महिमा अगाध आहे, जो स्वत:हून भक्तांची विघ्ने नष्ट करून त्यांना सदैव सुख देतो, जो स्वत: कलेमध्ये निपुण आहे व जो ओझर क्षेत्री वास करतो अशा परमेश्वराला मी नमन करतो व अशा परब्रह्मापाशी माझे मन सतत लागो अशी मी प्रार्थना करतो.

विघ्नेश्वराचे पुर्वाभिमुख भव्य मंदीर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील कुकडी नदीच्या तिरावरील ओझर या ठिकाणी आहे. मंदीर भोवताली भक्कम तटबंदी आहे. पूर्वेंच्या महाद्वारातून प्रवेश केल्यावर दोन उंच दिपमाळा लक्ष वेधून घेतात. दिव्याची रोषणाई केल्यावर प्रकाशात न्हाऊन निघणा-या दिपमाळांची शोभा अवर्णनिय असते. महाद्वाराच्या आत दोन बाजूंना डौलदार दगडी कमानी असणा-या, लांब रूंद ओव-या आहेत. त्यातील एका ओवरी खाली देवाचं सामान ठेवण्यासाठी तळखर आहे. मुख्य मंदीराच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूस दगडात कोरलेले भालदार, चोपदार अर्थात द्वारपाल आहेत. मंदीरात एका आत एक असे दोन सभामंडप आहेत. सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात विघ्नेश्वराची पूर्वाभिमुख पूर्णाकृती डाव्यासोंडेची, बैठी मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके व कपाळावर चकचकीत हिरा आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धि – सिध्दीच्या पितळी मूर्ती आहेत. गाभा-यातील कोनाड्यात पंचायतन मूर्ती आहेत.

सतकर्मात विघ्ने आणणा-या विघ्नासूराच्या विनंती वरून गणेशाने विघ्नेश्वर हे नाव धारण केले. त्याची कथा अशी की, हेमवती नगरीचा राजा अभिनंदन याने इंद्रपदाच्या लालसेने यज्ञ सूरू केले. यज्ञात सर्व देव-देवतांना योग्य ती आहूती देण्याची त्याने तयारी केली परंतू इंद्रपद घ्यायचे आहे. तर इंद्रास आहूती का द्या या विचाराने त्याने इंद्राला आहूती न देण्याचे ठरविले हि गोष्ट नारदमूनीने तत्काल आपल्या पध्दतीने इंद्रदेवास कथन केली. आपले इंद्रपद हिरावून घेण्यासाठी आरंभलेल्या अभिनंदन राजाचा इंद्रास राग आला. इंद्राने पवित्र कार्यात विघ्न आणणा-या काळास अभिनंदनाचे यज्ञ उध्वस्त करण्याची आज्ञा दिली. काळाने विघ्नसूराचे रूप घेऊन केवळ अभिनंदनाच्या यज्ञाचाच नव्हे तर पृथ्वीतलावरील सर्वच वैदीक कार्याचा नाश करण्याचा सपाटा लावला. त्यामूळे ऋषी मुनी, देव – देवता भयभीत होऊन पराशरमूनीच्या आश्रमात वास्तवास असणा-या गणेशास शरण गेले व हे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले. गणेशाने त्यांना अभय देऊन पाश्वपूत्राचे रूप घेऊन विघ्नसूराच्या रूपात असणा-या काळाशी युध्द आरंभले व त्याला बेजार करून टाकले. शेवटी हारलेला विघ्नासूर गणपतीस शरण आला. व जिवदान मागितले. गणपतीने, “जेथे माझी पूजा, अर्चना, स्मरण असेल तेथे तू असता कामा नये.” या अटीवर त्याला जिवदान दिले. परंतू विघ्नेसूराने गणेशाजवळ अजून एक विनंती केली की, भगवान तूमचे स्मरण माझ्या नावाने व्हावे. गणेशाने त्याची विनंती मान्य करून ते विघ्नेश्वर (विघ्नहर) झाले.

मार्ग : ओझर – पुणे – नाशिक रस्त्यावर नारायणगांव पासूनच ओझरला जाण्यासाठी फाटा फुटतो. नारायणगावपासून ओझरच्या विघ्नेश्वराचे देवस्थान अवघ्या १० कि.मी.वर पुणे – ओझर – ९८ कि.मी. नारायणगांव तसेच जुन्नरहून एस.टी, रिक्षा, जीप यांनी प्रवास करून आपण ओझरपर्यंत जाऊ शकतो.

0 comments: