3:34 AM




लेण्याद्रीचा गणपती उंच डोंगरात आहे. उंच डोंगरातल्या कुशीत खोदलेल्या लेण्यांमध्ये या गणपतीचे देऊळ आहे. दक्षिणाभिमुख असलेल्या या लेण्यांपर्यंत जायला सुमारे तीनशे पाय-या चढाव्या लागतात. पण , या पाय-या चढणे हादेखील एक छान अनुभव असतो.

मुळात या बुद्धकालिन अठरा लेण्या आहेत. त्यातल्या आठव्या गुहेत हे मंदिर आहे. त्यालाच गणेश - लेणी असेही म्हणतात. एकाच दगडात हे मंदिर घडवलेले आहे. या मंदिराचा सभामंडप पाहताना आपण थक्क होतो. ५३ फूट लांब , ५१ फूट रुंद आणि सात फूट उंच असेलल्या या सभामंडपला कुठेही पिलर नाहीत.
दक्षिणाभिमुख असलेली या मंदिरातली गिरिजात्मजाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. अष्टविनायकांच्या इतर गणपतींपेक्षा ही मूर्ती थोडी वेगळी आहे. कोरलेली मूर्ती असल्याने ती तितकीशी सुबक दिसत नाही. आजही या मंदिरात लाइट नाहीत. ज्या काळात हे मंदिर बांधले गेले त्याकाळात त्याची रचनाच अशी होती की , या मूर्तीवरच सरळ सुर्यकिरणे येतात.

लेण्यांशेजारीच गोड पाण्याचं टाकं आहे. हे पाणी स्वच्छ आणि थंड असतं. लेण्यांची व्यवस्था पुरातत्व खात्याकडे आहे. जुन्नरचे सरपंच देशपांडे हे देवालयाचे सरपंच आहेत.
लेण्यांकडे जाण्याचा रस्ता तसा फारसा खडतर नाही. पण नेहमी पाय-या चढताना वाटेत काही झाडे , सावली किंवा थांबण्याची सोय असते. अशी कोणतीही सोय लेण्याद्री चढताना उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊनच लेण्याद्री चढायची वेळ ठरवून ध्यावी , शक्यतो पहाटे किंवा दुपारी चार नंतर म्हणजेच उन्हे उतरल्यावर चढायला सुरवात करावी.

जशी इथे झाडे , सावली यांची सोय नाही तशीच या लेण्यांच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचीही सोय नाही. म्हणून इथे जाताना बरोबर खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊनच जावेत , असं मी सांगेन.

लेण्याद्रीचा गणपती तर सुंदर आहेच , तितकाच या भागाच्या आसपासचा परिसरही सुंदर आहे. या आसपासच्या परिसरात शिवनेरीचा किल्ला आहे. चावंडचा किल्ला , पूरचं कुकडेश्वर मंदिर आहे. त्याशिवाय जीवधान किल्ला , हडसर किल्ला हेदेखील इथून जवळच आहे. इथून तुम्ही सहजपणे नारायणगावलाही भेट देऊ शकता. तिथे आर्वीचं उपग्रह दळणवळण केंद्र , खोडदची रेडिओ दुर्बीण अशी अनेक ठिकाणे भेटी देण्यासारखी आहेत. म्हणूनच लेण्याद्रीच्या गणपतीला बेट द्यायला जाताना चार-पाच दिवसांची सवड काढूनच जायला हवे. त्यामुळे गणपतीचे दर्शन तर होऊलच , पण आजूबाजूचा निसर्गाने नटलेला हा नितांतसुंदर परिसरही पाहून होईल. आर्वीच्या दुर्बीणीसह अनेक नव्या गोष्टींशी ओळख होईल. द-याखो-यात रमणा-यांसाठी तर जीवधन , हडसर हे किल्ले आहेतच. म्हणूनच हा गणपती जरा तब्येतीत पाहा.

जुन्नर तालुक्यातलं लेण्याद्री जायला मुंबई-कल्याण ओतुरमार्गे सुमारे १७९ किमी आहे. पुणे- जुन्नर किंवा तळेगाव जुन्नर एस.टीने जाऊन तिथून पुढे बसने किंवा वाहनाने लेण्याद्रीला जाता येतं. राहण्याची आणि जेवण्याची जुन्नर आणि परिसरात होऊ शकते.

0 comments: